आयोरा (Indian Ocean Rim
Association–IORA) : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी १९९५ मध्ये भारताला भेट दिली तेव्हा IORA च्या संकल्पनेने जन्म घेतला. ते असे म्हणाले की, ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक-आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचे व्यासपीठ व्हावे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झाले आहेत, त्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे. या भावनेतून मार्च १९९७ मध्ये IORAचा जन्म झाला. आज या संघटनेत २२ सभासद आणि ९ संवाद-भागीदार आहेत. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामाईक व्यासपीठ तयार करणे, ही IORA ची मुख्य उद्दिष्टे आहेत.
◆ २००८ च्या नागरी आण्विक सहकार्य करारान्वये भारताने अणुप्रकल्पांचे ‘नागरी’ आणि ‘लष्करी’ असे विभाजन करून नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुउर्जा आयोगाच्या देखरेखी खाली आणले. त्याबदल्यात अमेरिकेने भारताच्या नागरी अणुप्रकल्पांबरोबर संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले; ज्यामुळे भारत हा अण्वस्त्र प्रसारबंदी
कराराच्या बाहेर राहूनही अण्वस्त्र क्षमता बाळगू शकणारा आणि आण्विक व्यापारात सहभागी होऊ शकणारा एकमेव देश झाला आहे.