प्रास्ताविक
वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांमध्ये सातत्याने मुलाखती वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. ‘मुलाकात’ या अरबी शब्दावरून ‘मुलाखत’ हा सर्वांना परिचित असलेला शब्द तयार झाला आहे. सभा, संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही प्रकट मुलाखती होत असतात. अशा मुलाखतींमधून व्यक्तींच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत घेणे आणि देणे हे खूपच कौशल्याचे काम असते. अलीकडे तर ‘मुलाखत घेणे’ या गोष्टीला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त होत आहे; म्हणूनच मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, मुलाखत कशी घ्यावी, नोकरी तसेच अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवा म्हणून मुलाखत कशी द्यावी, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी अशा काही मुद्द्यांबाबतची माहिती आपणाला असायला हवी.
■ स्वरूप
◆ मुलाखत म्हणजे संवाद.
◆ हा संवाद पूर्वनियोजित असतो. तो हेतुपूर्वक
घडवून आणला जातो.
◆ मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा अाणि ती
मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या
तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते.
◆ जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती
दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर
उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद
म्हणजेच मुलाखत होय.
थोडक्यात, दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक
झालेला वैचारिक, भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय.
या सहेतूक वैचारिक संवादासाठी, म्हणजेच
मुलाखतीसाठी
● व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी,
उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात.
● मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एकावेळी
एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ
शकते; तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक
व्यक्तींचीही मुलाखत घेऊ शकते.
● फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते.
● मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट
अशा विविध स्वरूपाची असते.
● मुलाखती विचारप्रवर्तक व भावनाप्रधान असतात.
● श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या
सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या,अनुभव कथन
करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून ,पुढील
पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या... अशा कितीतरी
वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात.
● ज्यांच्याजवळ ‘सांगण्यासारखे’ काही आहे आणि
ज्यांच्याकडून ‘ऐकण्यासारखे’ काही आहे अशा
व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. यात
लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक,
डॉक्टर, अध्यापक जसे असू शकतात .
● व्यावसायिक, उद्योजक, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ,
लेखक, कवी, गिर्यारोहक, संपादक, ज्येष्ठ
नागरिक, सैनिक, वैमानिक, पुरस्कार विजेते,
विचारवंत, शेतमजूर, कामगार, अगदी फेरीवालेही
असू शकतात.
सामान्यत: कर्तृत्वसंपन्न व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवला आहे अशा असाधारण व्यक्ती, ज्यांनी जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे अशी व्यक्तिमत्त्वे, समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे अशा व्यक्ती... अशा कितीतरीजणांची मुलाखत घेतली जाऊ शकते. अगदी सामान्य माणसांचीही
मुलाखत घेतली जाऊ शकते; अट फक्त एवढीच, की त्यांच्याकडे काहीतरी आगळेवेगळे सांगण्यासारखे असले पाहिजे.
■ हेतू
मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात.
◆ मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू
समजून घेण्यासाठी.
◆ व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत
घेतली जाऊ शकते.
◆ अनेकांचे जीवन म्हणजे एक संघर्षगाथा असते.
जनसामान्यांच्या मनात तो संघर्षजाणून घेण्याची
इच्छा असते. त्यासाठीही मुलाखत घेतली जाऊ
शकते.
◆ व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत
दडलेला ‘माणूस’ समजून घेण्यासाठी प्रामुख्याने
मुलाखत घेतली जाते.
◆ विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून
घेण्यासाठी, एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवे काही
माहीत करून घेण्याच्या हेतूने, एखादी घटना
सखोलपणे समजून घेण्यासाठी मुलाखतीचे
आयोजन केले जाते.
◆ मुलाखत देणारी व्यक्ती ज्या परिसरात लहानाची
मोठी झाली, तो परिसर जाणून घेण्यासाठी.
◆ समाजाचे प्रबोधन करण्यासाठी.
◆ जनजागृतीसाठी.
◆ कलांचा रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात.
मुलाखत घेण्यामागे असे अनेक हेतू असतात.
■ मुलाखतीची पूर्वतयारी
मुलाखत उत्तम व्हावी यासाठी पूर्वतयारी तर करावीच लागते. पूर्वतयारीचा गृहपाठ भरपूर करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे. सर्वांत महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे. उदा., त्यांचे पूर्ण नाव, असल्यास टोपणनाव, वय, जन्म दिनांक, जन्म स्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार, लेखनकार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदरच तयार ठेवावी लागते. मुलाखत
घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे. मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट जाणून घेतले पाहिजे. त्यानंतर तो विषय आणि ते उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार केले पाहिजेत. मुलाखतीसाठी किती वेळ असणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नसंख्या निश्चित करावी लागते. तसेच त्या प्रश्नांचा योग्य तो क्रमही लावून ठेवावा लागतो.मुलाखतीचे स्वरूप नेमके कसे आहे, ती प्रकट असणार आहे की लिखित स्वरूपाची, श्रोतृवृंद/वाचक नेमका कोणता असणार आहे, (विद्यार्थी, की विद्यार्थी आणि पालक एकत्र, की फक्त नागरिक, की फक्त महिला इत्यादी.)
याचीही माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे, की रेडिओसाठी आहे, की टी. व्ही. साठी आहे, हेही माहीत असले पाहिजे. मुलाखतीसाठी बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, गरजेनुसार संदर्भ ग्रंथ, चित्रे, वाद्ये, वस्तू इत्यादी गोष्टीही अगोदरच पाहून ठेवणे चांगले. आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटून घ्यावे, चर्चा करावी. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणे सुकर, सुलभ, सोपे होऊन जाते. आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील आणि प्रत्यक्ष मुलाखती ऐकल्यास मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी
नेमकी दिशा मिळण्यास मदत होईल.
मुलाखत कशी घ्यावी ?
■ मुलाखतीची सुरुवात.
मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या/वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या चार-सहा वाक्यांतच श्रोतेल/वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात/ वाचनात मनाने पूर्णत: गुंतले गेले पाहिजेत. ‘वेल बिगन इज हाफ डन्’ असे जे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमारेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी
नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली पाहिजे. एखादा नवाकोरा चुटका, ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या, टोकदार प्रश्नाचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकावता येतो. मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्याफुलक्या, दिलखुलास चेंडूंनी सुरू करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो. वातावरण मोकळे, हलके होते. मुलाखतीची ही नांदी जितकी जास्त श्रवणीय
होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल, मुलाखतकाराचा आत्मविश्वास दुणावत जाईल, मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते/वाचक त्या मुलाखतीत गुंतून जातील.
■ मुलाखतीचा मध्य.
चला, सुरुवात तर झाली. आता खरी बॅटिंग सुरू. विचारायच्या प्रश्नांची यादी तर समोर आहेच. त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची मात्र खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा, चौथा... या पठडीतून जात राहिले तर मुलाखत रूक्ष, पठडीछाप होण्याची भीती असते. म्हणून मग प्रश्नच असे लवचीक तयार करायचे, की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे. कौशल्यच आहे हे, थोडीशी आयत्या वेळची कसरतच; पण सरावाने ती जमते. प्रश्नांची यादी
मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. ही अशी प्रश्नोत्तरांची रंगीबेरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले, की ती एक सलग
दिमाखदार संवादमाला होऊन जाते. प्रश्नांतून उत्तरे, उत्तरांतून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न... बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये. मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक असावी, असलीच पाहिजे; पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्टच भरकटता कामा नये.सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळीची एकेक पाकळी उमलत जाऊन तिचे टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे तसे प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्त्व, त्याचे कार्यकर्तृत्व उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जावी. विषयाचे, व्यक्तिमत्त्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे समोर आले पाहिजेत. त्याच प्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा.त्याला अधिक व्यक्त होऊ द्यावे. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी, की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वांत जास्त महत्त्वाचे, विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारावेत. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यात द्यायचे आहे. हीच ती वेळ आहे.
■ मुलाखतीचा समारोप.
इतका वेळ कसे अगदी छान जमून आले होते; पण आता कुठेतरी थांबायलाच हवे; पण हे थांबणे म्हणजे कळसाध्याय असला पाहिजे. इथेच मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना, ‘अरेरे, फारच लवकर संपली मुलाखत!’ असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वत:साठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक, प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचे असते.मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती? तर अशी वेळ, की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो.अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीहवीशी वाटत असतानाच संपावी; पण ‘ती अपूर्णच, अर्धवटच राहिली’ अशा स्थितीतही संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच; पण ‘अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते’, असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. ‘पुन्हा कधी हा असाच वैखरीचा यज्ञ होणार असेल तर यायचेच’, असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजेत. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर
पडले, की समजावे ‘मुलाखत यशस्वी झाली; श्रोत्यांपर्यंत पोहोचली.’
■ नोकरीसाठी,प्रवेशासाठीची मुलाखत
नोकरीसाठी, एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अलीकडील काळात ज्या पद्धतीने मुलाखती घेतल्या
जातात त्यांचे स्वरूप झपाट्याने बदलू लागले आहे. उमेदवारांची बौद्धिक क्षमता, त्यांच्या ज्ञानाची पातळी, त्यांचा कल हे तर पूर्वीप्रमाणे आजही मुलाखतीं मध्ये जोखले जातेच; पण त्याहीपेक्षा आता अधिक भर दिला जातो तो उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यावर. उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारण्यावर आता भर
दिला जातो. केवळ नोकरीबाबतच नव्हे तर उमेदवाराचा एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन तपासण्याचे दिवस आता आले आहेत. आता उमेदवारांकडून वेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्यांची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णयक्षमता, भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, त्यांचे आत येणे, बसणे, उठणे, पोशाख, यापेक्षा ‘तुम्ही सध्याच्या स्पर्धेत
टिकून राहाल का, अपेक्षित उद्दिष्टे तुम्ही कितपत गाठू शकाल, गटकार्य आणि गटनेतृत्व करण्याचे कौशल्य तुमच्यात कितपत आहे, अडचणींना तुम्ही कसे आणि किती तोंड देऊ शकता, अडचणी येणारच नाहीत यासाठी तुम्ही काही करू शकता का, आपली चूक तुम्ही मान्य करू शकता का, आपल्या यशाचे श्रेय टीममधल्या इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी असते, इतरांचे विचार, भावना, सूचना स्वीकारण्याची तुमची कितपत तयारी असते’ हे सर्व आजकाल मुलाखतीत अधिक प्राधान्याने पाहिले जाते. उमेदवार बाह्य गोष्टींपेक्षा ‘आतून’ कसा आणि कितपत विकसित झालाय हे जाणून घेणे सध्याच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य झाले आहे.
मुलाखत घेताना ‘हे’ नक्की करावे.
★ मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत.
★ प्रश्नांची उत्तरे देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत
देणाऱ्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.
★ मुलाखतीचे सादरीकरण ओघवते, श्रवणीय,
उत्स्फूर्त असावे.
★ मुलाखतीदरम्यान अनौपचारिक व सकारात्मक
वातावरण निर्माण करावे.
★‘हो’, ‘नाही’, ‘माहीत नाही’, ‘नंतर सांगेन’ अशी
उत्तरे येणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रश्न तयार
करावेत.
★ संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना
खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग
भरावेत.
■ मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी
◆ चुकीचे, अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे.
◆ मुलाखत देणाऱ्याचा अवमान होईल असे प्रश्न
विचारू नयेत.
◆ ज्याद्वारे ताणतणाव, संघर्षनिर्माण होईल असे प्रश्न
नसावेत.
◆ मूळ विषय सोडून असंबद्ध प्रश्न विचारणे टाळावे.
◆ अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न
नसावेत.
◆ क्लिष्ट, अवघड प्रश्न विचारू नयेत.
◆ प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये.
◆ पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये.
◆ रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारणे
टाळावे.
◆ मुलाखतीदरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत.
◆ मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वत:
जास्त बोलू नये.
◆ मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी.