वाक्यप्रकार

आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्येवापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो. उदा., ‘काल खूप पाऊस पडला’, हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. 
     (१) काल फार पाऊस पडला. (विधानार्थी)
     (२) काल काही कमी पाऊस पडला नाही. (विधानार्थी)
     (३) काल काय कमी पाऊस पडला का? (प्रश्नार्थी)
     (४) काल कमी तर पाऊस पडला नाही ना? (प्रश्नार्थी) 
     (५) किती अफाट पाऊस पडला काल! (उद्गारार्थी)
वाक्याचे प्रकार
(अ) आशयावरून आणि भावार्थावरून   (आ) क्रियापदाच्या रूपावरून
       (अ) वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 
       (१) विधानार्थी (२) प्रश्नार्थी (३) उद्गारार्थी असे प्रकार आढळतात. ही वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात.
(१) विधानार्थी वाक्य- ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला ‘विधानार्थी वाक्य’ असे म्हणतात.
       उदा., (१) सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. (विधानार्थी)
              (२) विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. (विधानार्थी) 
(२) प्रश्नार्थी वाक्य- ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला ‘प्रश्नार्थी वाक्य’ म्हणतात. 
        उदा., (१) तू बाहेर केव्हा जाणार आहेस? (प्रश्नार्थी)
               (२) तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? (प्रश्नार्थी)
(३) उद्गारार्थी वाक्य- ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो, त्या वाक्याला ‘उद्गारार्थी वाक्य’ असे म्हणतात.
         उदा., किती छान आहे हे फूल! (उद्गारार्थी)
(आ) क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात.
(१) स्वार्थी वाक्य- ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला ‘स्वार्थी’ वाक्य म्हणतात.
       उदा., (१) मुले शाळेत गेली. 
               (२) खेळाडू मैदानावर सराव करतात.
(२) आज्ञार्थी वाक्य- ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला ‘आज्ञार्थी’ वाक्य म्हणतात. 
    उदा., (१) ती खिडकी लावून घे. (आज्ञा) 
            (२) तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. (आशीर्वाद)
            (३) देवा, मला सद्बुद्धी दे. (प्रार्थना)
            (४) कृपया, मला तुझे पुस्तक दे. (विनंती)
            (५) विद्यार्थ्यांनो, खूप मेहनत करा. (उपदेश)
            (६) इथे पादत्राणे ठेवू नयेत. (सूचना)
(३) विध्यर्थी वाक्य- ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला ‘विध्यर्थी’ वाक्य म्हणतात.
     (१) परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्य)
    (२) आज बहुतेक पाऊस पडेल. (शक्यता)
    (३) अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. (योग्यता)
    (४) विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा)
(४) संकेतार्थी वाक्य- ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत, असा अर्थनिघत असेल तर त्यास ‘संकेतार्थी’ वाक्य असे म्हणतात.
     उदा., (१) पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
             (२) मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन.
कृती 
(1) खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
(१) गोठ्यातील गाय हंबरते.
(२) श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
(३) किती सुंदर देखावा आहे हा!
(४) यावर्षी पाऊस खूप पडला.
(५) तुझा आवडता विषय कोणता?
2) खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
(१) प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
(२) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
(३) विद्यार्थी कवायत करत आहेत.
(४) विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.
(५) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
3.खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
(१) परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
(२) शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
(३) तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.